प्रतिनिधी. कारंजा लाड: सुजित भगत.
कारंजा तालुक्यातील गायवळ ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सोमवार, दिनांक 29/12/2025 रोजी महाश्रमदान शिबीर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती कारंजा-लाडचे गट विकास कृषी अधिकारी, पटवारी, ग्रामसेवक, तसेच गायवळ गावचे सरपंच, शिक्षकवर्ग, महिला बचत गटाच्या महिला, आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित भगत उपस्थित होते. सर्वांनी मिळून श्रमदान करत गाव स्वच्छता व विकासाचा संदेश दिला.
महाश्रमदान शिबिरानिमित्त लोकसहभागातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि सामूहिक जबाबदारीचे महत्त्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गावाच्या स्वच्छतेसाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले.
गायवळ ग्रामपंचायतीची ही कामगिरी नवीन नाही. यापूर्वीही ग्रामपंचायतीने सर्व लोकांच्या सहकार्याने ५० लाख रुपयांचे बक्षीस पटकावून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. तसेच, गायवळ येथील जिल्हा परिषद शाळेनेही जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांचा समन्वय साधत गायवळ ग्रामपंचायत सातत्याने आदर्श ठरत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे गायवळ हे गाव स्वच्छता, शिक्षण आणि लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण बनत आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
.png)
Post a Comment
0 Comments