प्रतिनिधी सुजित भगत.
मनोगत. प्रमोद देवळे.
आज सावित्रीमाई फुले यांच्या विचारांमुळेच त्यांच्या लेकी आज स्टेजवरून निर्भयपणे बोलताना दिसतात, उच्च पदांवर नोकरी करत आहेत, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी उतरंड (मी वरचा, तू खालचा) निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला सावित्रीमाईंनी आपल्या कपाळावर आडव करून समानतेचा संदेश दिला. सर्व लेकरांसाठी शिक्षणाची दारे उघडत, खरं-खोटं ओळखण्याची अक्कल समाजाला दिली, असे सांगण्यात आले.
गुलामीचे जीवन, स्वाभिमानशून्य आणि जनावरांसारखे जीवन जगणाऱ्या आपल्या लोकांना तर्कशील शिक्षण देऊन सावित्रीमाईंनी स्वाभिमानी माणूस घडवला. मात्र हे शिक्षण देत असताना त्या माऊलीला त्या व्यवस्थेतील मुठभर लोकांकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला, याची आठवण उपस्थितांनी करून दिली.
इतिहासात नमूद केल्याप्रमाणे सावित्रीमाई फुले शिकवण्यासाठी जाताना दोन लुगडे सोबत ठेवत असत. एक अंगावर असायचे आणि दुसरे सोबत. कारण त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकले जात. त्यामुळे अंगावरचे लुगडे खराब होत असे. अशा वेळी त्या माऊलीने खराब झालेले लुगडे बदलून, सोबत आणलेले स्वच्छ लुगडे नेसून पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवले, अशी घटना सांगण्यात आली.
या घटनेचा विचार करता सावित्रीमाईंनी एक ठाम उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. विखुरलेल्या जातीसमूहातील बहुजन समाज शिकला, तर तो राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक धर्माला समजून घेईल आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित समाज व राष्ट्र निर्माण करेल. हा समाजच पुढे शासनकर्ती जमात बनेल, असा त्यांचा विश्वास होता.
मात्र आज हे शिक्षण घेऊन आपण आपापल्या पोटापुरते झालो असून स्वतःचा स्वार्थ पाहू लागलो आहोत, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. सत्यपाल महाराज यांच्या शब्दांचा संदर्भ देत वक्त्यांनी सांगितले की, “बाल्याची माय, बाल्याची बाली, दहा बाय दहा खोली” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज आपण सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. मात्र ही जयंती साजरी करण्यामागचा खरा हेतू काय, याचा विचार होणे गरजेचे आहे. ही केवळ व्यक्तीची नव्हे तर विचारांची जयंती आहे. या निमित्ताने समाजात जाऊन जनजागृती करणे आणि सावित्रीमाई व महात्मा फुले यांचे राहिलेले अधुरे कार्य पूर्ण करणे, ही आपली जबाबदारी असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.
आजही गैरबराबरी, गुलामी आणि भेदभावाची व्यवस्था मुठभर लोक वेगवेगळ्या स्वरूपात राबवत आहेत. मात्र सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची अक्कल आपल्याकडे आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे सत्यशोधनाचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नाही, असे मत मांडण्यात आले.
या जयंतीनिमित्त सर्वांनी निर्धार करावा आणि आपल्या महापुरुषांना अभिप्रेत असलेला समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्यायावर आधारित समाज व राष्ट्र उभारण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
हेच खरे अभिवादन.
प्रमोद देवळे.
जय ज्योती, जय क्रांती.

Post a Comment
0 Comments