Type Here to Get Search Results !

संत सेवालाल महाराज : कर्म, विवेक आणि मानवमूल्यांचे महान मार्गदर्शक. अंधश्रद्धेविरोधी बहुजन विचारांचे निर्भीड प्रणेते.

 

प्रतिनिधी/सुजित भगत.

संत सेवालाल महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

संत सेवालाल महाराज हे केवळ संत नव्हते, तर अंधश्रद्धा, कर्मकांड आणि माणसामाणसातील विषमतेविरोधात उभे राहिलेले निर्भीड समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात लोकांना ठाम शब्दांत सांगितले की, देवाच्या नावावर चालणारी भजन-पूजा, अंधभक्ती आणि फसवणूक यापेक्षा कर्म, विवेक आणि माणुसकी अधिक महत्त्वाची आहे.

“कोई केणी भजो मत, कोई केणी पुजो मत” हा संदेश केवळ धार्मिक विधान नव्हता, तर तो समाजाला गुलाम मानसिकतेतून मुक्त करण्याचा क्रांतिकारी विचार होता. माणसाने कोणाच्याही पुढे नतमस्तक होऊ नये, स्वतःच्या बुद्धीचा, श्रमाचा आणि अनुभवाचा वापर करावा—हेच संत सेवालाल महाराज सातत्याने सांगत होते.

त्यांच्या प्रवचनातील हा उपदेश त्यांच्या विचारांची स्पष्ट भूमिका मांडतो—

कोई केणी भजो मत,

कोई केणी पुजो मत,

कोई केती कमी छेई.

भजे-पूजे वेळ घालेपेक्षा

कर्म करेर शिको,

मारे शिकवाडी पर ध्यान दिजो,

मार वातेन जाणजो,

छानजो अन पाचज माणजो.

या शब्दांतून संत सेवालाल महाराज माणसाला देव, धर्म आणि मध्यस्थांच्या जोखडातून बाहेर काढून विवेक, अनुभव आणि कर्माच्या मार्गावर आणतात.

गौतम बुद्धांनी दिलेला “अत्त दीप भव” हा संदेश आणि संत सेवालाल महाराज यांची वाणी एकाच विचारधारेतून आलेली आहे. दुसऱ्यावर, देवावर किंवा पाखंडी मध्यस्थांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कर्मातूनच मुक्तीचा मार्ग शोधा, हा त्यांचा स्पष्ट आग्रह होता.

संत सेवालाल महाराजांची ही शिकवण बहुजन महापुरुषांच्या परंपरेशी थेट जोडलेली आहे.

गौतम बुद्धांनी विवेक आणि करुणेचा मार्ग दाखवला.

संत तुकारामांनी कर्मयोगाचा संदेश दिला.

महात्मा फुले यांनी शिक्षण आणि सत्यशोधक विचार दिला.

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची मूल्ये दिली.

संत गाडगे महाराजांनी श्रम, स्वच्छता आणि माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला.

या सर्वांचा एकच संदेश आहे —

अंधश्रद्धा सोडा, शिक्षण घ्या, श्रम करा आणि समानतेवर आधारित समाज उभा करा.

आज जेव्हा धर्माच्या नावावर समाजात द्वेष, भीती आणि गुलाम मानसिकता पसरवली जात आहे, तेव्हा संत सेवालाल महाराज यांचे विचार सत्तेला, जातीय श्रेष्ठत्वाला आणि अंधभक्तीला थेट प्रश्न विचारतात. म्हणूनच हे विचार काहींना अस्वस्थ करतात — आणि म्हणूनच ते अधिक गरजेचे ठरतात.

संत सेवालाल महाराज यांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या नावाने उत्सव साजरे करणे नव्हे, तर त्यांनी दिलेल्या विवेकवादी, कर्मप्रधान विचारांची अंमलबजावणी करणे होय.

बहुजन समाजाने आज संत सेवालाल महाराज यांचा संदेश समजून घेणे आणि स्वीकारणे ही काळाची गरज आहे. अन्यथा अंधश्रद्धा आणि गुलाम मानसिकता समाजाला पुन्हा मागे नेल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

0 Comments