Type Here to Get Search Results !

*दुष्काळामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी, रोजगारासाठी उडत आहे हाहाकार - अल निनोचा घाला, शासनासोबतच तुमची-आमचीही वैयक्तिक जबाबदारी नाही तर काळाची हाक!*



*दुष्काळामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी, रोजगारासाठी उडत आहे हाहाकार - अल निनोचा घाला, शासनासोबतच तुमची-आमचीही वैयक्तिक जबाबदारी नाही तर काळाची हाक!*

 महाराष्ट्राच्या काळजाला आज भेगा पडल्या आहेत. शेताची छाती फाटली आहे. आईच्या डोळ्यात पाणी नाही, पण लेकराच्या घशाला कोरड पडली आहे. ही कविता नाही, हे महाराष्ट्राचे आजचे विदारक वास्तव आहे. विहिरींनी तळ गाठला, बोअरवेलने मान टाकली, धरणांची पाणी पातळी कमी होऊन, पोटात गाळ आणि भेगाच उरत आहेत. गावागावात, वाडी-तांड्यावर एकच हंबरडा ऐकू येतोय - पाणी द्या, काम द्या! हा एका गावचा नाही, तर 14 कोटी महाराष्ट्राचा हाहाकार आहे.

ज्यांनी 1972 चा दुष्काळ पाहिला, त्यांच्या अंगावर आजही काटा येतो. माणसांनी पाण्यासाठी मैलोनमैल वणवण केली. पण लक्षात ठेवा, यंदाचा अल निनोचा दुष्काळ त्या 1972 पेक्षाही दहापट भयंकर आहे. 1972 ला पाऊस लपंडाव खेळत होता, यंदा पावसाने चारही महिने आपली पाठ फिरवली आहे. नक्षत्रं कोरडी गेली, पेरण्या झाल्या पण बियाणे मातीतच जळून खाक झाले. हा ओला दुष्काळ नाही, हा निखळ कोरडा दुष्काळ आहे. प्रशांत महासागरातील तापमान वाढल्याने आपला मान्सूनच पळवून नेला गेला, यालाच हवामान तज्ज्ञ अल निनो म्हणतात. शास्त्रज्ञ ओरडून सांगत होते, पण आपण डीजे, लेझर लाईट आणि फटाक्यांच्या धांगडधिंग्यात मश्गुल होतो.

आज राज्यातील 35 पैकी 30 जिल्ह्यांमध्ये पाणी आणीबाणी आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश होरपळून निघत आहे. वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नगर, नाशिक - प्रत्येक ठिकाणी टँकर राज सुरू झाले आहे. ग्रामपंचायतीने नळाला पाणी येत नाही. काही भागात खेडे गावात महिला भगिनी पहाटे 4 वाजल्यापासून हंडा घेऊन टँकरची वाट पाहत आहेत. एका हंड्यासाठी रात्रभर जागरण, आणि त्यावरूनच वाद, भांडणे, हाणामारी!

शहरातही हेच चित्र दिवाळीनंतर दिसणार आहे. धरणे पिण्यासाठी राखीव ठेवल्याने शेतीचे पाणी बंद झाले आहे. 70% पाणी हवे तिथे 8-10% च पाणी शिल्लक आहे. उद्या नळाला थेंब येणार नाही तेव्हा काय करणार? पाणी म्हणजे जीवन, आणि तेच जीवन आपल्या हातातून निसटत आहे.

शेतात पीकच नाही तर शेतमजुराला काम कोण देणार? कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी - सर्व हातातून गेले. शेतकरी हतबल झाला, सावकाराच्या दारात उभा आहे. आणि शेतकरी कोसळला की शेतमजूर मरतो. आज गावागावात लाखो मजूर बेरोजगार झाले आहेत. सकाळी काम शोधायला निघालेला बाप संध्याकाळी रिकाम्या हाताने येतो, तेव्हा घरातील लेकरं उपाशी झोपतात.

बांधकाम व्यवसाय ठप्प, कारण पाणीच नाही. कारखान्यांचे उत्पादन घटले. गावात काम नाही म्हणून तरुण शहरात पळतोय आणि शहरातही काम नाही. ही दुहेरी कोंडी तरुणांना व्यसन, गुन्हेगारी आणि नैराश्याच्या खाईत लोटत आहे. रोजगार गेला म्हणजे फक्त पोटाचा प्रश्न नाही, तर कुटुंबाची, पिढीची राखरांगोळी आहे.

मागणी तेवढीच, पण पुरवठा शून्य! याचा अर्थ सरळ आहे - महागाईचा स्फोट. आज जी तूर डाळ 180 रु. आहे, ती उद्या 350 रु. होईल. तेल, साखर, भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल. खिशात पैसा असेल पण दुकानात धान्य नसेल. दुष्काळात पैशाला किंमत नसते, किंमत असते ती फक्त भाकरीला. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तर आणखी गंभीर - चारा छावण्या नाहीत तर जनावरे कत्तलखान्यात जाणार, शेतकऱ्याचे सर्वस्व संपणार.

पाणी नाही, काम नाही म्हणून गावं ओस पडू लागली आहेत. कुटुंबच्या कुटुंब स्थलांतर करत आहेत. यामुळे शहरांवर ताण, झोपडपट्ट्या वाढणार, गुन्हेगारी वाढणार, शाळा ओस पडणार, लेकरांचे शिक्षण थांबणार. आजारी माणसाला दवाखाना नाही, कारण पाण्याअभावी दवाखानेच बंद पडण्याची वेळ येणार आहे.

शासन टँकर, चारा छावणी, रोहयो कामे करतच आहे. पण 14 कोटींचा महाराष्ट्र एकटे शासन नाही सांभाळू शकत. हा कोणत्याही पक्षाचा दुष्काळ नाही, हा मानवतेचा दुष्काळ आहे. म्हणूनच शासनासोबतच तुमची-आमचीही वैयक्तिक जबाबदारी घ्यावी लागेल.

 प्रत्येकाने नळाला तोटी लावा, मोटारीने अंगण-रस्ता धुणे बंद करा. शेतीत ठिबक वापरा. छतावरचे पाणी जमिनीत जिरवा. एका माणसाने एक थेंब वाचवला तर महाराष्ट्रात 14 कोटी थेंब वाचतील.

शेतकऱ्यांनो, मजुराला वाऱ्यावर सोडू नका. व्यापारी, उद्योजकांनो, या काळात कामगार कपात करू नका. अर्धा पगार द्या पण हाताला काम द्या. तुमच्या एका निर्णयाने एका कुटुंबाची चूल पेटेल.

 प्रत्येक सुज्ञ कुटुंबाने 7-8 महिने पुरेल एवढा किराणा धान्य आजच घरात भरून ठेवा. पण शेजारच्या गरीब, वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा माता-भगिनीचाही विचार करा. तुमच्या ताटातली एक भाकरी भुकेल्याला द्या. तहानलेल्या जीवाला पाणी पाजा. मुक्या जनावराची पक्षाची चारा पाण्याची सोय करा. हाच खरा धर्म, हाच खरा सण.
 माझी सर्व दानशूर, व्यापारी, राजकीय नेते, सरपंच, ग्रामसेवक, श्री हनुमान मंदिर, श्री जगदंबा मंदिर, संत गजानन महाराज मंदिर ट्रस्ट यांना कळकळीची विनंती आहे. आपापल्या गावात पुढचे 7-8 महिने दररोज सदावर्त अन्नछत्र, पाणपोई, जनावरांसाठी हौद, गरिबांसाठी मोफत औषध वाटप सुरू करा. शासन येईल तेव्हा येईल, पण तोवर आपणच एकमेकांचा आधार होऊया.

मित्रांनो, हा लेख घाबरवण्यासाठी नाही, जागे करण्यासाठी आहे. दिवाळी साजरी करा, पण दिखावा टाळा. महागडा मोबाईल, टीव्ही, कपडे, रंगरंगोटी यंदा नको. वाचवलेला प्रत्येक रुपया पुढचे आठ महिने तुमच्या लेकराचा प्राण वाचवेल.

लक्षात ठेवा, दुष्काळ हा फक्त पावसाचा नसतो, तो माणुसकीचाही असतो. पावसाचा दुष्काळ निसर्गाने पाडला, पण माणुसकीचा दुष्काळ आपण पडू देऊ नका. सावध व्हा, सतर्क राहा, बचत करा आणि माणूस म्हणून जगा!
---
*लेखक - संजय मधुकरराव कडोळे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ साहित्यिक, लोककलावंत, पत्रकार, गोंधळीनगर, कारंजा (लाड) जि. वाशिम, मो. ९०७५६३५३३८*

Post a Comment

0 Comments